पत्रकाराच्या हत्येचा सोनई प्रेस क्लबतर्फे निषेध

पत्रकाराच्या हत्येचा
सोनई प्रेस क्लबतर्फे निषेध
सोनई पोलिसांना दिले निवेदन; सीबीआय चौकशीची केली मागणी
विरोधात बातमी छापली म्हणून रत्नागिरी येथील पत्रकाराची हत्या करण्यात आली. या प्रकाराचे तीव्र पडसाद नेवासा तालुक्यातही उमटले आहेत. आज सोनई प्रेस क्लब व पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी सोनई पोलिस ठाण्यात जात पोलिस उपनिरिक्षकांना निवेदन दिले.
पत्रकारांवर हल्ले, दमदाटी होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची कारखाली चिरडून नुकतीच हत्या करण्यात आली. विरोधात बातमी लावल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्याच अनुषंघाने या घटनेचा सखोल तपास करुन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी, सोनई पत्रकार संघातर्फे करण्यात आली.
सोनई पोलिस स्टेशन येथे जात पत्रकारांनी पोलिस उपनिरिक्षक राजू थोरात यांना निवेदन दिले. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विनायक दरंदले, अविनाश राऊत, नवनाथ कुसळकर,खंडागळे मामा,संजय वाघ, अशोक भुसारी, सुनील दरंदले, गणेश बेल्हेकर,मोहन शेगर, संभाजी शिंदे, रवी शेटे सुरेश दारकुंडे आदी यावेळी उपस्थित होते.