भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचे पाय धरणे आवश्यक – स्वामी विवेकानंद शास्त्री*

*भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचे पाय धरणे आवश्यक – स्वामी विवेकानंद शास्त्री*
संत व सामान्य लोक यांची भाग्याच्या उदयाची व्याख्यात फरक असतो. सामान्य लोकाला संसारात थोडा जरी फायदा झाला की ते भाग्य मिळाले असे म्हणतात. मात्र संत तुकाराम महाराज म्हणतात की मला जर संतांचे पाय मिळाले तर शेवटपर्यंत मी त्यांच्या पायाजवळ राहील. याने माझ्या भाग्याचा उदय होईल.जन्माला येणारा प्रत्येक जण भाग्य घेऊन आलेला आहे पण ते भाग्य जन्माला आल्यावरच कळते. चांगले आई वडील, मित्र, नातेवाईक मिळणे याला भाग्यच लागते असे मौलिक विचार शिरूर (का.) येथील सिद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनप्रसंगी शास्त्रीजी भाविकांसमोर बोलत होते. कीर्तन सेवेसाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा प्रकरणातील, भाग्याचा उदय ।
ते हे जोडी संतपाय ॥१॥
येथूनिया नुठवूं माथा ।
मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
होई बळकट ।
माझ्या मना तूं रे धीट ॥३॥
तुका आला लोटांगणीं ।
भक्तीभाग्या जाली धणी ॥४॥
हा ४ चरणाचा तुमच्या आमच्या भाग्याचा उदय सांगणारा अभंग घेतला होता. यावेळी पुढे बोलताना शास्त्रीजी म्हणाले की गुरु वर श्रद्धा ठेवा त्यांची निंदा करू नका. मनाने बळकट व्हायला पाहिजे संतांचे पाय लागले की भक्ती, भाग्य आहे याची तृप्ती होते. पूर्वी केलेल्या कर्मानुसार भाग्य ठरते. आपल्याला संतभेट होणे, जीवन समजून सांगणारे, चांगला मार्ग दाखवणारे अत्यंत दुर्मिळ आहेत. माझ्यावर माझे गुरु महंत डॉ. नामदेव शास्त्रीजी महाराजांचे प्रचंड उपकार आहेत. मोठी माणसे लवकर लक्षात येत नाहीत. गेल्या ३४ वर्षापासून मी त्यांच्याजवळ आहे. मीही त्यांच्याजवळ निष्ठेनेच राहिलो. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महात्म्यच फार वेगळे आहे. संतांचीही प्रचंड परीक्षा असते. त्यांना दूरदृष्टी असते. देवपण मिळेल पण साधूपण मिळणार नाही. संतांची वचने माणसाच्या हृदयात जाऊन परिवर्तन करतात. संत हे अवलिया असतात. जीवनात चांगल्या मार्गदर्शकाची अत्यंत आवश्यकता आहे. संतांजवळ गेल्यावर मर्यादा असावी. त्यांनी देव हस्तगत केलेला असतो म्हणून संत हे कोणालाही जुमानत नाहीत. म्हणून त्यांच्याजवळ गेल्यावर आपला शहाणपणा गुंडाळून ठेवावा. संतांच्या चरणावर (पायावर) आपला माथा ठेवा आपले कल्याणच होईल. संतांची जवळीकता म्हणजे त्यांचे ‘पाय’ आहेत. सेवेचे प्रचंड महत्त्व आहे सेतू बांधण्यासाठी खारुताईचा वाटा, वन किंवा जंगल जळत असताना ते विझविण्यासाठी चिऊताई आपल्या चोंचीने पाणी आणत होती तसे. संत संगतीत सुखाला पारावर राहत नाही मात्र त्यांच्या जवळ राहण्यासाठी मन बळकट लागते. वेळेच्या अगोदर आणि भाग्यापेक्षा जास्त कोणालाही काही मिळत नाही असेही शेवटी शास्त्रीजी म्हणाले.
कीर्तनासाठी मृदंगाची साथ दत्ताजी सटले, गायनाची साथ नाशीकेत जरे, संजय देवकर, शिवदास कदरे, कृष्णा बादाडे यांच्यासह आदींनी दिली. कीर्तनासाठी वडगाव व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.